अन्नधान्य पुरवठा विभागातील भ्रष्टाचाराला लगाम लावण्यासाठी शासनाने बायोमेट्रिक प्रणाली द्वारे धान्य वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे मे २०१८ पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली त्यामुळे तब्बल ३हजार मेट्रिक टन धान्याची बचत झाली असून हे धान्य काळ्याबाजारात जात होते. शहरात सर्वाधिक दीड हजार मेट्रिक टन धान्य दलालांच्या घशात जाण्यापासून वाचले आहे. रेशन व्यवस्थेतील हा काळाबाजार डोळे विस्फरणारा होता.
पुरवठा विभागातील भ्रष्टाचार कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला आहे. शासकीय अधिकारी कर्मचारी आणि रेशन दुकानदार यांच्या अभद्र युतीने हजारो मेट्रिक टन धान्य काळ्याबाजारात जात होते. सर्वसामान्य कधीही रेशन दुकानाकडे फिरकत नसला तरी त्याच्या नावावरील धान्याची मात्र रीतसर उचल होत होती. गोदामापासून ते रेशन दुकानदारांपर्यंत या चोरीच्या साखळीने या व्यवस्थेला भ्रष्ट केले. शासनाने बायोमेट्रिक प्रणाली द्वारे रेशन दुकानातून धान्य वाटपाचा निर्णय घेतला आणि विभागातील भ्रष्टाचाराला चाप लागला आहे. मे २०१८ पासून बायोमेट्रिक प्रणाली द्वारे वितरीत केलेल्या धान्यामुळे तब्बल १हजार ७९७८ मेट्रिक टन गव्हाची तर १ हजार १७४ मेट्रिक टन तांदळाची बचत झाली. महिन्याकाठी तब्बल ३ हजार १५२ मेक टन धान्यांची बचत होत आहे. यावरून रेशन विभागात किती मोठ्या प्रमाणावर धान्य भ्रष्टाचार यांच्या हातात जात होते याची कल्पना येऊ शकेल.
असे वाचले धान्य...
अन्नसुरक्षा योजनेतील प्राधान्य कुटुंबाना दिल्या जाणाऱ्या धान्यात ४५१ मेट्रिक टन गव्हाची तर ५७७ मेट्रिक टन तांदळाची बचत झाली आहे. केशरी कार्ड वितरणातील ५९१ गव्हाची ४१५ मे टन तांदळाची बचत झाली. अंत्योदय योजनेद्वारे वितरित करण्यात येणाऱ्या धान्यापैकी तब्बल ४३६ मेट्रिक टन गहू तर १८२ मेट्रिक टन तांदूळ भ्रष्टाचाराच्या दाढेतून वाचला आहे.
जानेवारी २०१८ या महिन्यात जिल्ह्यात ९ हजार ८७ मेट्रिक टन गहू तर ६ हजार मेट्रिक टन तांदूळ रेशन कार्डधारकांना वितरित करण्यात आला होता. मे २०१८ या महिन्यानंतर बायोमेट्रिक प्रणाली द्वारे धान्य वितरित करण्यात आले. त्यानंतर भ्रष्टाचाराला चांगलाच आळा बसला. जानेवारी २०१९ या महिन्यात ७ हजार १०९ मेट्रिक टन गहू तर ४ हजार ९३० मेट्रिक टन तांदूळ रेशन दुकाना दारे वितरित करण्यात आला. त्यामुळे तब्बल १ हजार ९७८ मेट्रिक टन गव्हाची तर १ हजार १७४ मेट्रिक टन तांदळाची बचत झाली.
शहरात वाचले अडीच हजार मेट्रिक टन धान्य...
औरंगाबाद शहरात धान्याचामोठा काळाबाजार होत होता. बोगस रेशन कार्ड धारकांच्या नावाने होणारा हा काळाबाजार आता रोखला गेला आहे. महिन्याकाठी तब्बल २ हजार ५५२ मेट्रिक टन धान्याची बचत झाली आहे. अंत्योदय योजनेतील ३७४ मेट्रिक टन गहू तर १५५ तांदूळ बायोमेट्रिक सिस्टिमद्वारे वाचला आहे. प्राधान्य कुटुंबातील ५६० मेट्रिक टन गहू तर ४३९ मेट्रिक टन तांदूळ वाचला आहे. केशरी कार्डधारकांसाठी वाटण्यात येणारा ११ मेट्रिक टन गहू तर १२ मेट्रिक टन तांदूळ बायोमेट्रीक प्रणालीने वाचला आहे. एकंदरीत शहरात मोठ्या प्रमाणावर धान्याचा काळाबाजार होत होता हे आता उघड झाले आहे.